शांती कशाने मिळते?

         

how-to-get-peace,शांती कशाने मिळते?
how-to-get-peace
         जुन्या लोकांनी संसारासाठी खूप खस्ता खाल्लेल्या असतात. कोंड्याचा मांडा करून मूलं वाढवली, घडवली. रक्ताचं पाणी, हाडांची काडं करून नंदनवन उभं केलं. वय झाल्यावर घरातली नव्याने कर्ती झालेली पिढी त्यांना आराम करायला सांगते. पण ते ऐकतच नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत चालतच राहतात. ते गेल्यावर लोक म्हणतात, "खूप खपला, पण शांती नाही मिळाली!" शांती मिळते की, मिळवावी लागते? ज्याला योग्य वेळी थांबता येतं, त्याला शांती मिळते. जो धावत राहतो, तो शांत कसा असू शकेल? कुत्र्याला कधी शांतपणे चालताना पाहिलंय? कायम धावणं हाच त्याचा स्वभाव असतो. 'कुत्र्याचं जिणं' हा वाक्प्रचार त्यावरूनच आला असेल!

            ज्ञानेश्वरीमध्ये पावलोपावली माऊलींनी शांतीचं इतकं गोड वर्णन केलंय की, त्यापुढं अमृतही फिकं वाटावं. जगताना शरीराची धाव थांबवता येत नसते. मनाची धाव खुंटायला हवी. मनाची धावं संपली की, हाव आटते. हाव आटली की, शांती भेटते. मनाची धाव खुंटण्यासाठी त्याला कुठल्यातरी खुंट्याला बांधायला हवं. ती खुंटा म्हणजे भक्ती. एकदा ईश्वराशी जवळीक निर्माण झाली की, आपल्याला आणखी काही मिळवायचंय, हा अपूर्णतेचा भावच खलास होतो. ज्ञानं पाहिजे, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, मान पाहिजे या सगळ्या हव्यासाला 'भव' म्हणतात. तो सागराप्रमाणे अमर्याद आहे. म्हणून त्याला 'भवसागर' म्हणतात. हा तरायाचा असेल, तर शांती हवी. शांतीसाठी भक्ती हवी.

     भक्त अपेक्षारहित असतो. भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारोनि।। प्राप्तीमध्ये तृप्ती नाही. आशा संपली की, तृप्ती आहे. आशारहीत व्यक्ती सागरासारखा धीरगंभीर आणि नित्यतृप्त असतो. वर्षाकाळात दुथडी भरून वाहणारे प्रवाह सागराला मिळतात, म्हणून त्याला उचंबळून येत नाही. उन्हाळ्यात नद्या आटतात, म्हणून समुद्र सुकत नाही. सुर्याच्या घरात दिवा लावून उजेड पाडावा लागत नाही. त्याचा प्रकाश स्वयंसिध्द आहे. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ समजतो, त्याला एखाद्या भिल्लाच्या पालाची अपेक्षा कशी असणार? ज्याला अमृताची चव कळलीय तो कण्या कशाला खाईल?

        काहींना कशाची नसली तरी, ज्ञानाची हाव असते. भले त्याचा जीवनात उपयोग असो वा नसो. ज्याला देव मिळालाय त्याला काहीही जाणायचं बाकी राहत नाही. कारण ईश्वर स्वत:च ज्ञानस्वरूप आहे. तैत्तिरीय उपनिषद सांगतं, 'सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्म।' ज्ञेय संपलं की ज्ञातेपणाही संपतो. भक्तीरूपी रसायन तुमच्या सार्या अपेक्षांचा नाश करतं. अपेक्षा संपली की, शांती स्वत:सिध्दच आहे. तिला बाहेर शोधण्याची गरज नाही. ईश्वरनिष्ठ वारकर्याचा चेहरा एकदा नीट पहा. त्याच्या चर्येवर तुम्हाला शांतीचा महासागर दिसेल. अकृत्रिम, निखळ शांतीसुख. माऊली म्हणतात, तैसी ज्ञेया देतां मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटीं ।मग उरे तेंचि किरीटी । शांतीचें रूप ॥

रमेश वाघ, नाशिक.

संपर्क - ९९२१८१६१८३

शांती कशाने मिळते,how-to-get-peace

शांती कशाने मिळते?

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या